अमळनेर तालुक्यात दोन आत्महत्यांच्या घटनांनी उडाली खळबळ

दहिवद येथे गळफास तर जानवे येथे विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात दहिवद व जानवे येथे दोन वेगवेगळ्या आत्महत्यांच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दहिवद येथे एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, तर जानवे येथे एका तरुणाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहिवद येथील राजेंद्र श्रावण माळी (वय ३८) यांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून आत्महत्या केली. दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते दिसत नसल्याने व त्यांचा फोनही लागत नसल्याने पुतण्याने त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता ते घरात दोरीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. नातेवाईक व मित्रांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत. दुसरी घटना जानवे येथे घडली. १ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलीस पाटील विलास पाटील यांना जानवे शिवारातील चंद्रशेखर राजाराम पाटील यांच्या विहिरीत एक मृतदेह तरंगताना दिसत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विलास पाटील, विठ्ठल भिल, विनोद भिल व संदीप भिल यांनी खाटीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मृत व्यक्तीची ओळख अमोल सुनील भिल (वय २१) अशी पटली. अमोल हा २५ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. त्यानंतर २७ मे रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली होती. अखेर १ जून रोजी त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणीही अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *