
पेपर लिक प्रकरणाच्या निषेधार्थ अमळनेरात आज महाविकास आघाडी व जागृत तरुणांचा निषेध मोर्चा
अमळनेर (प्रतिनिधी) दिल्ली येथील जंतर-मंतर येथे पेपर लिक प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या कथित घटनेच्या निषेधार्थ अमळनेर येथे आज, सोमवार (दि. २० जुलै) सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडी आणि जागृत तरुणांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेष्ठ वैज्ञानिक सोहम वांगचुक यांचे उपोषण सुरू असताना त्यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हटविण्यात आले. तसेच आंदोलनात सहभागी अभिजित दिपके यांना मारहाण करून त्यांच्या अंगावर शाई फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित घटनेचा निषेध नोंदवत केंद्र सरकारविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. हा निषेध मोर्चा शहरातील जिल्हा परिषद विश्रामगृहासमोरून सकाळी अकरा वाजता सुरू होणार असून, सर्व पक्षांचे पदाधिकारी, तरुण-तरुणी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाचे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन निळे, तालुकाप्रमुख राजेंद्र मराठे आणि शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार यांनी केले असून, तरुणांच्या हक्कांसाठी आणि पेपर लिक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी एकजूट दाखवावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply