अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करताना पालिका कर्मचाऱ्यांची कसरत

अमळनेर (प्रतिनिधी) अतिवृष्टी आणि पुरामुळे अमळनेर शहरातील शेकडो घरे, दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार अमळनेर नगरपरिषदेने विशेष पथकांमार्फत नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू केले आहेत. मात्र, शहरी भागातील नुकसानीसाठी स्वतंत्र पंचनामा नमुना उपलब्ध नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. पूरग्रस्तांची संख्या मोठी असताना उपलब्ध मनुष्यबळ मर्यादित असल्यामुळे पंचनाम्याचे काम प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे.

सध्या वापरला जाणारा ‘नैसर्गिक आपत्ती पंचनामा’ हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील नुकसानीचा विचार करून तयार करण्यात आलेला आहे. या नमुन्यात पिके, जनावरे, शेती, जमीन खचणे आदी बाबींचा समावेश आहे. मात्र, शहरी भागात पुरामुळे होणारे नुकसान हे वेगळ्या स्वरूपाचे असते. घरांची संरचनात्मक हानी, घरगुती साहित्य, फर्निचर, विद्युत उपकरणे, व्यापारी मालसाठा, महत्त्वाची कागदपत्रे तसेच वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याची सविस्तर नोंद करण्यासाठी सध्याच्या पंचनामा नमुन्यात आवश्यक स्वतंत्र बाबींचा अभाव आहे. महसूल विभागातील अधिकारी पंचनामे करण्यासाठी प्रशिक्षित असतात. मात्र, नगरपरिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या पंचनाम्याचा पूर्वानुभव नसल्याने नुकसानाचे मूल्यांकन, पुरावे नोंदविणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणी येत आहेत. त्यातच पूरग्रस्तांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकापर्यंत वेळेत पोहोचून पंचनामा पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

शहरी भागातील पूरग्रस्तांचे नुकसान अचूकपणे नोंदविण्यासाठी स्वतंत्र पंचनामा नमुना तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या नमुन्यात घरगुती व व्यावसायिक मालमत्तेचे नुकसान, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मालसाठा, कागदपत्रे, वाहने तसेच इतर नुकसानीच्या बाबींचा स्वतंत्रपणे समावेश करण्याची आवश्यकता आहे. तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना महसूल विभागामार्फत आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी आहे.

स्वतंत्र शहरी पंचनामा नमुना आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास नुकसानाचे मूल्यांकन अधिक अचूक, पारदर्शक आणि जलद पद्धतीने होण्यास मदत होईल. परिणामी पूरग्रस्त नागरिकांना शासनाकडून मिळणारी मदत वेळेत मिळण्याचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

नुकसानीसाठी स्वतंत्र पंचनामा नमुना आवश्यक

शहरातील पूरग्रस्तांचे नुकसान हे ग्रामीण भागापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे असते. त्यामुळे पंचनाम्यासाठी स्वतंत्र शहरी नमुना असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पालिका कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिल्यास पंचनामे अधिक अचूक होतील आणि नागरिकांना शासनाची मदत वेळेत मिळेल.

-सुधाकर बंडू येवले, पूरग्रस्त नागरिक, पिंपळे रोड,अमळनेर

 

प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

 

पूरग्रस्त नागरिकांचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी नगरपरिषदेने विशेष पथके कार्यरत केली आहेत. पूरग्रस्तांची संख्या मोठी असल्याने पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांना शासनाची मदत लवकर मिळावी, यासाठी पंचनामे पारदर्शक व गतीने पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.

-गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *