
ऑनलाईन एनसीएमसी कार्ड एजंटवर कारवाई; जादा पैसे उकळल्याचा प्रकार उघड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे येथील एका ऑनलाईन एनसीएमसी कार्ड एजंटवर प्रशासनाने कारवाई केली आहे. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून संबंधित एजंटकडून कार्डासाठी जादा शुल्क आकारले जात असल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एनसीएमसी कार्डसाठी अधिकृत शुल्क १९९ रुपये (नोंदणी शुल्क १६८ रुपये व १८ टक्के जीएसटी ३१ रुपये) इतके असताना संबंधित दुकानदार नागरिकांकडून ३०० रुपये घेत होता. यामुळे संतप्त नागरिकांनी मुंबई सेंटर येथील एसटीच्या ऑफिसला ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जळगाव आगाराला कळविण्यात आल्यानंतर जळगाव विभागाचे दिलीप बंजारा यांनी अमळनेर आगार व्यवस्थापकांकडे ही तक्रार दिली. त्यानंतर आगार व्यवस्थापकांनी तत्काळ दखल घेत स्थानक प्रमुख अनिकेत न्हायदे यांना रणाईचे येथे चौकशीसाठी पाठवले. प्रत्यक्ष चौकशीदरम्यान तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित एजंटचे मशीन जप्त करून आगारात आणण्यात आले.
या कारवाईनंतर आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी व स्थानक प्रमुख अनिकेत न्हायदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जात असल्यास त्वरित अमळनेर आगारात लेखी तक्रार द्यावी. अशा एजंटविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply