‘बोला सखाराम महाराज की जय’च्या जयघोषात संत सखाराम महाराजांची पारंपरिक पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना;

भाविकांसह महाराज २३ दिवसांत ५५० किमी प्रवास करणार

अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी वारीचे वेध लागलेल्या वारकरी संप्रदायात बुधवारी अमळनेर भक्तिरसाने न्हाऊन निघाले. सद्गुरू संत सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थानची सुमारे २५० वर्षांची परंपरा लाभलेली पारंपरिक पायी दिंडी ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने पंढरपूरकडे रवाना झाली. तब्बल २३ दिवसांत सुमारे ५५० किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून ही दिंडी २३ जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार आहे.

प्रस्थानापूर्वी गादीपती परमपूज्य संत प्रसाद महाराज यांनी सकाळी वाडी येथे कीर्तन करून समाधी दर्शन घेतले. त्यानंतर वाडी संस्थानातून पैलाड भागातील तुळशीबागेत आगमन झाले. येथे विठ्ठलाच्या मूर्तीवर तुळशीपत्र अर्पण करून विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी १२.३० वाजता आरतीनंतर ‘बोला सखाराम महाराज की जय’ आणि ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या जयघोषात दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

तुळशीबाग परिसरात सकाळपासूनच वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. वीणा-भजनी मंडळांच्या सुरेल भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते. महिला वारकऱ्यांनी ढोल-ताशांच्या निनादात रिंगण करत ठेका धरला, तर टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. अमळनेरसह परिसरातील शेकडो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले. सुमारे बाराशेहून अधिक भाविकांनी शहराच्या वेशीपर्यंत दिंडीसोबत पायी चालत जाऊन संत सखाराम महाराजांना भक्तिभावाने निरोप दिला.

भाविकांच्या सुविधेसाठी तुळशीबागेत मोठा शामियाना उभारण्यात आला होता. गादीपती परमपूज्य संत प्रसाद महाराज यांनी भाविकांना खडीसाखरेचा प्रसाद वाटला. यावेळी ॲड. रवींद्र देशमुख, रविकांत देशमुख, राजेंद्र भामरे, श्रीराम भानगातकर, रमेश जोशी, उदय देशपांडे, महेश दुसाने, नगरसेविका पुष्पा भोई, पंकज भोई, अनिल जोशी, केतन जोशी, महेश कोठावदे, मनोज देवकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सिद्धार्थ शिसोदे, जितेंद्र ठाकूर, चेतन राजपूत, किरण पाटील, डीगंबर महाले, नितीन निळे, नगरसेवक पंकज चौधरी, नावेद शेख, प्रा. लीलाधर पाटील, प्रा. सुधीर पाटील, मनोज भांडारकर, संजू ठेकेदार, दिलीप ठेकेदार, विनोद महाजन, राहुल देशमुख आणि गणेश महाजन यांच्यासह वारकरी, ट्रस्टी व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेरहून निघालेली ही दिंडी सडावण, पारोळा, भडगाव, पिशोर, दौलताबाद, पैठण, शेवगाव, पाथर्डी, आष्टी, करमाळा, करकंब आणि गुरसाळे आदी मार्गाने खान्देश व मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करत पंढरपूरला पोहोचणार आहे. उन्हाचा तडाखा, पाऊस किंवा वाऱ्याची पर्वा न करता वारकरी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने हा प्रवास पूर्ण करतात. यावेळी अमळनेर तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे वारकऱ्यांना पायी वारीदरम्यान उपयोगी पडणाऱ्या मोफत औषधी किटचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या विविध दिंड्यांचे मानाच्या नारळाने स्वागत करण्याचा मान संत सखाराम महाराज संस्थानला लाभलेला आहे. तसेच आषाढ शुद्ध दशमीला संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी स्वागताचा मानही या संस्थानच्या गादीपुरुषांना मिळतो. त्यामुळे वारकरी संप्रदायात अमळनेरच्या या पारंपरिक दिंडीला विशेष मानाचे स्थान आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *