अमळनेर येथे भरदिवसा व्यापाऱ्यावर मिरची पावडर फेकून साडेपाच लाखांची रोकड लंपास

पिंपळे रस्त्यावर तिघांचा थरार; आरोपी फरार

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडली असून स्कुटीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना २५ रोजी सकाळच्या सुमारास पिंपळे रस्त्यावर घडली असून शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बाजार समितीचे व्यापारी यतीन कोठारी हे स्कुटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनकडे जात होते. त्यावेळी तोंडाला मास्क लावलेले तीन जण मोटरसायकलवरून त्यांच्या जवळ आले. आरोपींनी प्रथम कोठारी यांचा चष्मा काढून फेकला आणि लगेचच त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कोठारी गोंधळले असताना त्यांच्या जवळील साडेपाच लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी खाली पडली. संधी साधत चोरट्यांनी ती पिशवी उचलली आणि तेथून फरार झाले. घटनेनंतर व्यापाऱ्याने पोलिसांना तोंडी माहिती दिली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी उशिरा पर्यंत अधिकृत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *