सार्वजनिक ठिकाणी डासांचा उपद्रव वाढला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात सध्या डासांचा प्रचंड उपद्रव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरपालिकेने तातडीने फॉगिंग, औषध फवारणी, साचलेले पाणी काढणे आदी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डी. ए. धनगर यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सार्वजनिक ठिकाणे, कॉलनी परिसरातील मोकळ्या जागा तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात डास नियंत्रणासाठी फॉगिंग मशीन किंवा औषध फवारणी होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात सत्ताधारी व विरोधक यांच्या राजकीय वादात सामान्य नागरिकांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित राहत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच सकाळ, सायंकाळ व रात्री डासांचा त्रास अधिक जाणवत आहे. मोकळ्या जागेत वाढलेले डास घरांमध्ये येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.  नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारलेल्या लोकप्रतिनिधींना वारंवार लक्षात आणून देऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करून डास नियंत्रण मोहीम राबवावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *