अमळनेरात मोकाट गुरांविरोधात पालिकेची मोहीम

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात मोकाट गुरांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे पकडून गोशाळेत जमा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, गुरे परत घेण्यासाठी मालकांना गोशाळेतील पालनपोषणाचा खर्च तसेच नगरपरिषदेचा स्वतंत्र पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

 

शहरात मोकाट गुरांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत होत्या. अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुरांचे कळप बसत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन किरकोळ अपघातही घडत होते. भाजी बाजारात नागरिकांच्या दुचाकींना टांगलेल्या पिशव्यांतील भाजीपाला खाणे, घरांच्या कंपाऊंडमध्ये घुसून झाडांची नासधूस करणे तसेच बाहेर वाळत घातलेले धान्य आणि खाद्यपदार्थ खाऊन नुकसान करणे, अशा प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले होते.

या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अतिक्रमण विभागाला मोकाट गुरांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र चावरीया, सुनील संगेले, विशाल सपकाळे, चंदू बिऱ्हाडे, राज रामराजे, दर्शन बिऱ्हाडे आणि अविनाश बिऱ्हाडे हे कर्मचारी मोकाट गुरे पकडून विशेष वाहनाद्वारे गोशाळेत जमा करण्याची कारवाई करत आहेत.

गोशाळेत जमा केलेल्या गुरांची योग्य प्रकारे चारापाणी व देखभाल केली जाणार आहे. मात्र संबंधित गुरे मालकांना आपली जनावरे परत हवी असल्यास गोशाळेत ज्या कालावधीत त्यांचा सांभाळ करण्यात आला त्या कालावधीचा खर्च भरावा लागेल. याशिवाय नगरपरिषदेकडून स्वतंत्रपणे पाचशे रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे.

 

सर्वांनी शिस्तीचे पालन करावे

 

“गुरे मालकांनी आपापली गुरे घरात किंवा गोठ्यात बांधून ठेवावीत. रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे आढळल्यास ती तातडीने गोशाळेत जमा केली जातील. विनाकारण दंड भरावा लागू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सर्वांनी शिस्तीचे पालन करावे.” गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *