
विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी; निरीक्षक अशोक काकडे यांचा अमळनेरात सखोल आढावा
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्णत्वाकडे नेली आहे. या अनुषंगाने गुरुवारी, दि. ११ सकाळी ११ वाजता निवडणूक निरीक्षक अशोक काकडे यांनी अमळनेर तहसील कार्यालयाला भेट देऊन मतदान केंद्रासह विविध निवडणूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
या निवडणुकीसाठी १८ जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी तहसीलदारांचे दालन मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. या केंद्रावर अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील एकूण ७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान होणार आहे. यावेळी निरीक्षक अशोक काकडे यांनी मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील मूलभूत सुविधांची तपासणी केली. मतदान केंद्रावर अखंडित वीजपुरवठा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, इंटरनेट व दळणवळण सुविधा तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी विद्युत व्यवस्था उपलब्ध ठेवण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश देत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या दक्षतेने पार पाडाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शांततापूर्ण, निष्पक्ष आणि विश्वासार्ह वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले. या पाहणी दौऱ्यावेळी उपविभागीय अधिकारी विनयकुमार गोसावी, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश निकम, उपविभागीय कृषी अधिकारी, अमळनेर व चोपडा तालुका कृषी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, भरारी पथकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडावे आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे शंभर टक्के पालन व्हावे, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply