वर्दळीच्या पाच पावली मंदिराजवळ वडाचे झाड कोसळले; मोठा अनर्थ टळला

“पवन चौकातील खोदकाम अर्धवट; नागरिकांच्या जीवाशी सुरू आहे खेळ!”

“कुंटे रस्ता, पाच पावली देवी मंदिर परिसरात जीवघेणे खड्डे; नागरिक संतप्त”

 

अमळनेर (प्रतिनिधी) मुंबईतील मुसळधार पावसात झाड कोसळून एका चिमुकल्याचा, तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनांनंतर सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, अमळनेर शहरात शनिवारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. शहरातील  रस्त्यावरील पाच पावली देवी मंदिराजवळील जुने व जीर्ण वडाचे झाड अचानक कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने हे झाड मुख्य रस्त्यावर न पडता समोरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या दिशेने कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा हा मार्ग दिवसभर वर्दळीचा असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चोपडा रस्ता हा शहरातील प्रमुख मार्गांपैकी एक असून या मार्गावर दिवसभर वाहनांची, शाळकरी विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांची, दुचाकीस्वारांची तसेच पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे शहरातील धोकादायक अवस्थेतील झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी अथवा हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

“पवन चौकातील खोदकाम अर्धवट; नागरिकांच्या जीवाशी सुरू आहे खेळ!”

 

 दरम्यान, शहरातील पवन चौक परिसरात गटाराच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही तेथे झाकण किंवा भराव टाकण्यात आलेला नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

 

“कुंटे रस्ता, पाच पावली देवी मंदिर परिसरात जीवघेणे खड्डे; नागरिक संतप्त”

 

याशिवाय कुंटे रस्ता तसेच पाच पावली देवी मंदिरासमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात ते पाण्याखाली जात असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरातील जीर्ण व धोकादायक झाडांचे सर्वेक्षण, उघड्या चेंबर्सवर तातडीने झाकणे बसविणे तसेच रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

 

आवश्यक उपाययोजना करण्यात येतील

 

“शहरातील धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने छाटणी किंवा हटविण्याची कारवाई केली जाईल. तसेच उघड्या चेंबर्सवर झाकणे बसविणे आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत संबंधित विभागांना त्वरित सूचना देण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.”

— गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *