
अग्निशमन दिनी तात्काळ कारवाई; दोन ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण
अमळनेर (प्रतिनिधी) : अग्निशमन दिनाच्या दिवशी दुपारी सुमारे २:०० वाजेच्या सुमारास शहर व तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. वरणेश्वर मंदिर परिसरात शॉर्टसर्किटमुळे झाडांना आग लागली, तर तालुक्यातील आर्डी येथील शेतकरी राहुल पाटील यांच्या शेतातील चाऱ्याला आग लागली होती.
दोन्ही घटनांची माहिती मिळताच अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वेळीच पोहोचून तातडीने आग विझवण्याचे काम हाती घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणी आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या कारवाईत अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, आनंदा झिम्बल, आकाश संदानशिव, लखन कंखरे आणि वसीम पठाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Leave a Reply