साने गुरुजी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांत यश; हितांश पाटील नवोदय परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील साने गुरुजी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध शालेय तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, इंडियन ऑलिम्पियाड तसेच एमटीएस मंथन जनरल नॉलेज परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत हितांश निंबा पाटील याने अमळनेर शहरी विभागातून प्रथम क्रमांक मिळवला. योगांक्षी संजीव पाटील हिने शहरी विभागातून तृतीय क्रमांक पटकावला, तर प्रांजल सुरेश मोरे हिने तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशासोबतच हितांश निंबा पाटील याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले आहे. तसेच तो सैनिकी शाळेच्या प्रवेशासाठीही पात्र ठरला आहे.

इंडियन ऑलिम्पियाड परीक्षेत चेतना तुषार नाथबुवा हिने राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला, तर कनिष्क किशोर गवळी याने राज्य गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकावला. भार्गव गोविंदा माळी आणि विराज विनोद पाटील यांनी सुवर्णपदक मिळवले, तर प्रणव विलास महाले याला ‘एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला..एमटीएस मंथन जनरल नॉलेज परीक्षेत वेद पुरुषोत्तम पाटील याने केंद्रातून द्वितीय क्रमांक, तर शौर्य अमोल सातपुते याने केंद्रातून तृतीय क्रमांक मिळवत शाळेची मान उंचावली. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, किरण पाटील, प्रा. डॉ. शेख, मुख्याध्यापक संजीव पाटील तसेच शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *