
धावडे येथे तापी नदीत अवैध वाळू उपसा; ठेकेदारांवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धावडे गावाजवळ तापी नदी पात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत धावडे येथील सरपंच व ग्रामस्थांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, धावडे परिसरातील अधिकृत ठेक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या वाळू ठेकेदारांकडून तापी नदीपात्रात बोटींच्या सहाय्याने चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक केली जात आहे. रात्रीच्या वेळी तसेच पहाटेच्या सुमारास हा अवैध उपसा सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या प्रकाराला विरोध करण्यासाठी गावकरी संबंधितांशी जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. धावडे गावातून तसेच परिसरातील अनेक गावांना तापी नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीपात्रातील मोठ्या प्रमाणातील अवैध वाळू उपशामुळे जलसाठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात पाण्याची पातळी खालावल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. नदीपात्रातील बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याबरोबरच नदीकाठची धूप वाढण्याची शक्यता असल्याचेही जाणकारांचे मत आहे. त्यामुळे महसूल विभाग, गौण खनिज विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही धावडे ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply