
२०१० पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी सक्ती रद्दची मागणी; खासदार स्मिता वाघ यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) : २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) सक्तीची लागू करू नये, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने खासदार स्मिता वाघ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. खासदार संपर्क अभियानांतर्गत त्यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत शिक्षकांच्या विविध अडचणी मांडण्यात आल्या.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी सक्तीची करण्यात आल्याने अनेक शिक्षकांच्या नोकरी व पदोन्नतीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे २५ लाख शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांवर परिणाम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे संसदेत आवश्यक कायदेशीर दुरुस्ती करून २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी शिक्षकांच्या मागणीचा पाठपुरावा करून या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान महासंघाचे राज्य नेते अशोक मदाने, हेमंतकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, अमळनेर तालुकाध्यक्ष आशिष पवार, जळगाव तालुकाध्यक्ष निलेश मोरे यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply