
प्रामाणिक ऑटोचालकामुळे ७ लाखांचे सोने पुन्हा मिळाले परत
लग्नघरातील चोरीचा दुःखद धक्का बदलला आनंदात
अमळनेर (प्रतिनिधी) लग्नाच्या आनंदात असलेल्या घरावर अचानक चोरीचे सावट आले आणि क्षणात वातावरणावर दुःखाची छाया पसरली. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानासोबतच एका सामान्य नागरिकाच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेले सुमारे ७ लाख रुपये किमतीचे चार तोळे सोने पुन्हा कुटुंबाच्या हाती परत आले. अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे घडलेल्या या घटनेने प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीचे हृदयस्पर्शी उदाहरण समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिंपळे येथील शेतकरी जिजाबराव शंकर पाटील यांच्या मुलाचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी ठरले होते. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण होते. ६ फेब्रुवारी रोजी हळदीचा कार्यक्रम पार पडला होता. रात्री जेवणानंतर घरातील मंडळी नाचगाण्यात रमली असताना नवरदेवाच्या आजींना वरच्या मजल्यावरील कपाटाचे लॉक उघडे दिसले. त्यांनी कपाट तपासले असता चार तोळे सोने आणि सुमारे ४० हजार रुपये रोख रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले.
या घटनेमुळे लग्नघरात एकच खळबळ उडाली. आनंदाच्या वातावरणात अचानक काळजी आणि चिंता पसरली. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. बीट हवालदार कैलास शिंदे आणि सागर पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थितांना धीर देत शांत राहण्याचे आवाहन केले आणि लग्नाचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यास सांगितले. यावेळी पोलिसांनी आरोपीचा माग काढला असून सीसीटीव्ही फुटेजवरून तो ओळख पटली असल्याचे सांगत चोरट्यावर मानसिक दबाव निर्माण केला. पोलिसांच्या या युक्तीचा परिणाम झाला आणि घाबरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच रात्री गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील एका ठिकाणी सोन्याचे दागिने फेकून पलायन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील ऑटो रिक्षा चालक आणि सर्वांच्या परिचयाचे आबा पोपट पाटील त्या परिसरात गेले असता त्यांना ते सोन्याचे दागिने दिसले. परिस्थितीचा अंदाज घेत त्यांनी कोणताही मोह न बाळगता तात्काळ गावकऱ्यांना बोलावले. सर्वांच्या उपस्थितीत त्यांनी ते दागिने मोजून नवरदेवाच्या वडिलांच्या स्वाधीन केले. हरवलेले सोने पुन्हा मिळाल्याने जिजाबराव पाटील यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. लग्नघरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लग्नमंडपातच गावकऱ्यांच्या उपस्थितीत आबा पोपट पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण घटनेत पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे आरोपीवर दबाव निर्माण झाला, तर एका सामान्य ऑटो रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे लाखोंचे सोने योग्य मालकापर्यंत परत पोहोचले. या घटनेने परिसरात पोलिस व नागरिकांच्या सहकार्याचे सुंदर आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

Leave a Reply