
पिंपळे रोड प्रभाग ८ मध्ये “नळातून पाणी की गटार?” नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने होतोय संताप
नगरसेवक सचिन (भुरा भाऊ )पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात गंभीर बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे नळातून येणाऱ्या पाण्यात गटारीचे पाणी मिसळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला असह्य दुर्गंधी येत असून ते पाणी पिण्यास किंवा वापरण्यास अयोग्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. या गंभीर समस्येबाबत अनेक वेळा नगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पिंपळे रोड परिसरातील नाल्याची साफसफाई करण्यात आली असली तरी त्यातून काढलेला कचरा मागील आठ दिवसांपासून तसाच पडून असल्याचेही समोर आले आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कचरा उचलण्यात येत नसल्याचा आरोप नगरसेवक सचिन पाटील यांनी केला आहे. नाल्यातील कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून त्यामुळे रोगराई पसरू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नगराध्यक्ष स्वतः डॉक्टर असतानाही शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नगरसेवक सचिन पाटील यांनी केली. “नगराध्यक्ष केवळ रबरी शिक्का ठरले असून त्यांचे रिमोट कंट्रोल नंदुरबारमधून चालते. तेथून जसे आदेश येतील तसेच काम केले जाते,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
तसेच, पिंपळे रोड परिसरातील नाल्यातील कचरा तात्काळ उचलून पाणीपुरवठ्याच्या समस्येवर दोन दिवसांच्या आत ठोस उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा नागरिकांसह आगळे-वेगळे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक सचिन पाटील यांनी दिला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply