
लखनऊतील अपघातात अमळनेरच्या वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी डॉ. सुमित पाटील याचा मृत्यू
उभ्या ट्रकला मोटरसायकलची धडक; उपचारादरम्यान डॉ. सुमित पाटील यांची मालवली प्राणज्योत

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ढेकू रोडवरील जिजाऊ नगर परिसरातील रहिवासी आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेले डॉ. सुमित पाटील यांचा लखनऊ येथे झालेल्या अपघातात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ७ जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र ९ जून रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे अमळनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, डॉ. सुमित पाटील हे सारबेटेकर प्रा. आर. एस. पाटील यांचे सुपुत्र तर जळगाव जिल्हा परिषदेचे अधिकारी डी. एस. पाटील यांचे पुतणे होते. ते लखनऊ येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. ७ जून रोजी रात्री ते मोटरसायकलवरून जेवणासाठी जात असताना रस्त्यावरील एका वळणावर ट्रक उभा होता. ट्रकचे मागील टेल लॅम्प बंद असल्याने त्यांना ट्रकचा अंदाज न आल्याने मोटरसायकल थेट ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना तातडीने लखनऊ येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचार सुरू असतानाच ९ जून रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. डॉ. सुमित पाटील यांची अंत्ययात्रा १० जून रोजी सकाळी ११ वाजता जिजाऊ नगर, ढेकू रोड येथील निवासस्थानातून निघणार आहे.

Leave a Reply