
अमळनेरमध्ये संत सखाराम महाराजांच्या जयघोषात सामाजिक ऐक्याचा रथोत्सव उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी )संत सखाराम महाराज की जयच्या गजरात सामाजिक ऐक्य, परंपरा आणि बारा बलुतेदारांच्या सहभागातून अमळनेरचा ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. अभय देव व आरती देव यांच्या हस्ते रथाची विधिवत पूजा करण्यात आली. हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पूजा करून लालजींची मूर्ती रथावर विराजमान करण्यात आली.
या रथोत्सवातील सामाजिक सलोख्याचे विशेष दर्शन घडवणारा क्षण म्हणजे सलीम बेलदार या मुस्लिम बांधवाला पहिली मोगरी लावण्याचा मान देण्यात आला. यामुळे धार्मिक एकात्मतेचा सुंदर संदेश समाजासमोर उभा राहिला.
रथात संत सखाराम महाराजांचा मुखवटा व पादुका, विठ्ठल-रुख्मिणी, ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकाराम महाराज आदी संतांचे प्रतीक, तसेच गरुड, हनुमान, नगारखाना, घोडेस्वार, मशालधारी, भालदार-चोपदार यांचा समावेश होता. ढोल-ताशांच्या गजरात, टाळकरी व वारकरी यांच्या ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात रथ मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली.
हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते विश्वस्त, पदाधिकारी आणि प्रतिष्ठित मान्यवरांना प्रसाद देण्यात आला. सुरुवातीला काही अंतर दोराने रथ ओढण्यात आला, त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने पुढील प्रवास सुरू झाला.
यावेळी आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगराध्यक्ष बाविस्कर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, डॉ. अनिल शिंदे, मोहन सातपुते, अनिल महाजन, पंकज चौधरी, भूषण भदाणे, निलेश भांडारकर, महेश देशमुख, श्रीराम चौधरी, होमगार्ड समादेशक अरुण चौधरी, नितीन निळे, गोपी कासार, नरेंद्र संदानशिव, मनोज भांडारकर, उदय देशपांडे, प्रा. सुधीर पाटील, नावेद शेख, हरीश देशमुख, पंकज भोई, बाळू पाटील, नाना धनगर, पवन शेटे, जितेंद्र देशमुख, ॲड. श्याम जाधव, शुभम देशमुख, प्रतिक देशमुख, मयुरेश देशमुख, विजय देशमुख, अनिकेत देशमुख, प्रवीण पाठक, नरेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, निलेश मोरे, नितिन कापडणे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद सोनवणे, कपिल पाटील, जे. डी. पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच संजय बोरसे व रवींद्र बोरसे या वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करत अवजड वाहनांना रथमार्गावर बंदी घातली.
वाडी चौक, गुरव गल्ली, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोड, पैलाड, कसाली मार्गे रथ मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महाराजांना बोलावून त्यांची पूजा करण्यात आली. फरशी पुलावर रथ पोहोचताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सकाळी रथ पूर्ववत जागेवर आणण्यात आला.
अमळनेरच्या सांस्कृतिक वारशाचे, सामाजिक ऐक्याचे आणि भक्तीभावाचे दर्शन घडवणारा हा रथोत्सव नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply