
श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पारंपरिक शिधा वाटप; दोन शतकांची जपली परंपरा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री सद्गुरू संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. २८) वाडी संस्थानच्या प्रांगणात पारंपरिक शिधा वाटपाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सुमारे दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या या उपक्रमात प.पू. प्रसाद महाराज यांच्या हस्ते सेवेकऱ्यांना प्रसादरूपाने कोरडा शिधा वितरित करण्यात आला.
अमळनेरच्या प्रसिद्ध यात्रोत्सवात विविध धार्मिक व पारंपरिक सेवा बजावणाऱ्या १२ बलुतेदारांसह इतर समाजातील मानाच्या सेवेकऱ्यांचा सन्मानपूर्वक समावेश करण्यात येतो. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्त व सेवेकऱ्यांची मोठी गर्दी होती. नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे संपूर्ण शिधा वाटप कार्यक्रम सुरळीत पार पडला. या परंपरेत ब्राह्मण, बेलापूरकर महाराज, तानाजी मठातून येणाऱ्या दिंड्या तसेच विविध भागांतून आलेल्या संत-महाराजांचा सहभाग असतो. याशिवाय कुंभार, भालदार, चोपदार, धोबी, सुतार, लोहार, भावसार, चांभार, मातंग, फकीर, भोई, नाथबुवा, कोळी, जिनगर, बेलदार, शिंपी, धनगर, गुरव, खाटिक, कसाई आदी विविध समाजघटकांनाही शिधा वाटप करण्यात येते. एकादशीच्या दिवशी उपवासासाठी लागणारा साबुदाणा, भगर, शेंगदाणे, तिखट व मीठ यांचा समावेश असलेला शिधा दिला जातो. तर द्वादशी ते चतुर्दशी दरम्यान कणीक, तांदूळ, तूरडाळ, तेल, मीठ, तिखट आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेला शिधा वितरित केला जातो. या उपक्रमासाठी मनोज भांडारकर, विठ्ठल शिवदे, मनोहर महाजन, गोपाल शिंपी, केदार देशमुख, संजय चंद्रस, राजेंद्र जोशी, पवन शेटे, प्रविण पवार आदी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
ही परंपरा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारी, सेवाभाव वृद्धिंगत करणारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यात्रोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.
असा करण्यात आला शिधा वाटप
द्वादशी शिधा वाटपात पुजारी, चोपदार, न्हावी, धोबी, सुतार, वारकरी आदी सेवेकऱ्यांना कणीक (५ पाट्या), तांदूळ (२ माप), तूरडाळ (१ माप), तिखट (५० ग्रॅम), जिरे (२० ग्रॅम), मोहरी (२० ग्रॅम), हळद (२० ग्रॅम), मीठ व तेल (१ चमचा) असा शिधा देण्यात आला. तसेच गावकरी व डफ वाजवणाऱ्यांना कणीक (२ पाट्या), तूरडाळ, मीठ व तेल यांचा समावेश असलेला शिधा वितरित करण्यात आला.

Leave a Reply