गणेशोत्सवासाठी अमळनेर आगाराच्या ३२ बसेस कोकणात रवाना; १७८ बसफेऱ्या रद्द

अमळनेर (प्रतिनिधी) एसटी आगाराच्या ३२ बसेस गणेशोत्सवासाठी कोकणात रवाना करण्यात आल्याने अमळनेर आगारातून होणाऱ्या एकूण १७८ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाहेरगावी तसेच परदेशात नोकरीसाठी असलेले कोकणवासीय या काळात मोठ्या संख्येने आपल्या गावी जातात. त्यामुळे शासनाकडून गणेशोत्सवानिमित्त विशेष बससेवा आणि रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली जाते. राज्यातील विविध एसटी आगारांतून बसेस कोकणाकडे रवाना केल्या जातात. अमळनेर एसटी आगारातून १० सप्टेंबर रोजी ३२ एसटी बसेस कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. त्यासोबत ३२ चालक आणि ३२ वाहकदेखील रवाना झाले आहेत. त्यामुळे अमळनेर आगारातून सुटणाऱ्या नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर, सुरत, पंढरपूर, धुळे, पारोळा, पिंगळवाडे, खडके, गांधली, तामसवाडी, हिंगोणे, पाडसे आदी मार्गांवरील एकूण १७८ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच एकूण २९ नियते रद्द करण्यात आली आहेत. यामुळे स्थानिक काही गावांतील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार असून गैरसोय होण्याची शक्यता आहे. शासनाच्या आदेशानुसार धार्मिक उत्सवासाठी हे नियोजन करण्यात आले असल्याने नागरिकांनी याची नोंद घेऊन एसटी आगाराला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रवाशांनी बसच्या वेळेची माहिती घेऊनच प्रवास करावा

 

प्रवाश्यानी बस च्या वेळेची माहिती घेऊन प्रवास करावा , विद्यार्थ्यांनी सायंकाळी अंधार पडण्यापूर्वी आपापल्या गावी परतावे व अमळनेर आगाराला सहकार्य करावे. दहा बारा दिवसात आपली सेवा पूर्ववत होईल. त्यामुळे सहकार्य कराव.

राकेश शिवदे , आगार व्यवस्थापक अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *