महिलेच्या घरात घुसून सहा जणांकडून मारहाण; कपडे फाडून सोन्याची पोत हिसकावली

अमळनेर (प्रतिनिधी) शाहआलम नगरात घरात डोकावल्याचा जाब विचारल्याच्या रागातून सहा जणांनी रात्री महिलेच्या घरात घुसून तिला व तिच्या दोन दिरांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी महिलेचे कपडे फाडून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना १५ एप्रिल २०२६ रोजी घडली. न्यायालयाच्या आदेशाने अमळनेर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ एप्रिल रोजी ती घरी एकटी असताना सावाले गफूर शेख करीम, फारुख शेख मजीद व फरीद शेख मजीद हे तिच्या घरात डोकावत होते. महिलेने त्यांना हटकले. त्यानंतर रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास मजीद शेख गफूर, उस्मान शेख नासिर, फारुख शेख मजीद, रफीक शेख मजीद, फरीद शेख मजीद व गफ्फार शेख करीम हे सहा जण महिलेचा पती घरी नसताना घरात घुसले. त्यांच्या हातात लहान-मोठे लोखंडी रॉड होते. त्यांनी अश्लील शिवीगाळ करत महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडणाचा आवाज ऐकून महिलेचे दीर आसिफशहा रज्जाकशहा व शाबीरशहा रज्जाकशहा तेथे आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. फारुखने आसिफच्या डाव्या हाताच्या मनगटावर व कमरेवर, तर गफ्फारने रॉडने शाबीरच्या डाव्या मनगटावर मारहाण केली. मजीदने महिलेच्या पोटावर लाथ मारून हातातील रॉडने तिच्या उजव्या हातावर मारहाण केली. तसेच सर्वांनी तिला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यानंतर मजीदने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. न्यायालयाच्या आदेशाने महिलेच्या तक्रारीवरून सहाही जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७६, ३०९, ३३३, ११५(२), ११८(१), १८९(१), १९१(२), १९०, १९१(३) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *