अमळनेर येथे महेश नवमी उत्साहात साजरी

भव्य मिरवणूक, गुणगौरव सोहळा व महाप्रसादाने वातावरण भक्तिमय

अमळनेर (प्रतिनिधी)  माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिन महेश नवमी अमळनेर येथे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान महेश (शंकर) यांची भव्य मिरवणूक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भगवान शिवजींची भव्य मिरवणूक वसई देवी मंदिरापासून प्रारंभ झाली. डी.जे.च्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेली ही मिरवणूक सुभाष चौक, नगरपालिका, महाराणा प्रताप मार्ग, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक मार्गे शिवाजी महाराज उद्यानाजवळील शिवमंदिरात पोहोचली. तेथे भगवान महेश यांची वंदना, आरती व दर्शनानंतर मिरवणूक श्री स्वामिनारायण मंदिरात विसर्जित करण्यात आली.

यावेळी अमळनेर नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, गटनेते पंकज चौधरी, माजी नगरसेवक मुन्ना शर्मा, नगरसेवक महेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी भगवान महेशाची आरती करून दर्शन घेतले.

 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

 

मिरवणुकीनंतर श्री स्वामिनारायण मंदिरात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कु. युक्ती गोविंद कलंत्री, कु. कशिश हरनारायण गिल्डा, कु. नेहा लालचंद सामरे आणि कु. भूमि विवेक लाठी यांचा समावेश होता.

यावर्षीच्या महेश नवमी महाप्रसादाचे आयोजन अशोकजी तेजकरण मणियार व परिवार यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी किशोर मणियार यांचे नातू जियांश दिनेश मणियार याने भगवान शंकराची आकर्षक वेशभूषा साकारून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमात अशोक मणियार व परिवाराचा सत्कार अमळनेर तालुका अध्यक्ष पंकज मुंदडा, शहराध्यक्ष दिनेश मणियार, तालुका सचिव गणेश कलंत्री आणि शहर सचिव रामानंद गिल्डा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच खानदेश शिक्षण मंडळावर निवड झाल्याबद्दल योगेश मुंदडा व पंकज मुंदडा यांचाही समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मणियार यांनी केले. यावेळी समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने माहेश्वरी समाज बांधव उपस्थित होते. माहेश्वरी महिला मंडळाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक मूल्यांचा संगम घडविणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *