मंडळाच्या हिशोबावरून आणि फटाके फोडण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) गणेश मंडळाच्या आर्थिक व्यवहाराचा हिशोब देण्यावरून आणि फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना शहरातील पानखिडकी भागात ९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. या वादात दोन्ही गटांकडून एकमेकांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. एका तरुणाच्या खांद्याला चावा घेण्यात आला, तर दुसऱ्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला. याशिवाय कट्टा आणून गेम करून टाकण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पहिल्या गटातर्फे सौरभ मिलिंद भावसार याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तो, यश संजय भावसार, प्रेम कैलास पाटील आणि चेतन सुरेश चौधरी हे गल्लीतील सत्कार हेअर स्टाईल दुकानाजवळ बसले होते. त्यावेळी हरीश राजेंद्र भावसार हा त्यांच्याकडे फटाके जाळून फेकत होता. यश त्याला समजावण्यासाठी गेला असता त्याने दुसऱ्या दिवशी बघून घेण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हरीश बेकरीच्या ओट्यावर बसलेले असताना हरीश राजेंद्र भावसार, दीपेश महाजन (रा. वडचौक) आणि वैभव पाटील (रा. श्रीकृष्ण कॉलनी, पैलाड) हे तिघे मोटारसायकलने इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ आले. त्यावेळी यश भावसार तेथे आला आणि हरीशचा फोन आल्याचे सांगून त्याने हरीशजवळ जाताच त्याला चापटाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. सौरभ भांडण सोडविण्यासाठी गेला असता हरीश, दीपेश आणि वैभव या तिघांनी त्यालाही मारहाण केली. दीपेश महाजन याने सौरभच्या डाव्या खांद्याला चावा घेतला, तर हरीश आणि वैभव यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आजूबाजूच्या लोकांनी भांडण सोडविल्यानंतर दीपेश महाजन याने कट्टा आणून गेम करून टाकेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल नरेश बडगुजर करीत आहेत.

दुसऱ्या गटातर्फे हरीश भावसार याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मकरंद दिलीप भावसार, सौरभ मिलिंद भावसार, जय संजय भावसार आणि यश संजय भावसार हे सर्व जय बजरंग मंडळाचे कार्यकर्ते आहेत. यंदा मंडळाचा आर्थिक व्यवहार कार्यकर्त्यांनी आपल्याकडे दिला होता. ९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याचे मित्र वैभव भिला पाटील (रा. पैलाड) आणि दीपेश महाजन (रा. वडचौक) हे बाहेरून जेवण करून आले असता जय संजय भावसार उर्फ बंटी आणि यश संजय भावसार उर्फ मॉन्टी यांनी मंडळाचा हिशोब मागत शिवीगाळ सुरू केली. तसेच हॉटेलमध्ये जेवण करण्याच्या कारणावरूनही अपमानास्पद बोलल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जय याने कानावर व डोळ्यावर चापटांनी मारहाण केली. त्यानंतर यश याने मकरंद आणि सौरभ यांना बोलावून घेतले. मकरंद आणि सौरभ यांनी लाकडी दांडक्याने उजव्या पायावर मारल्याने पाय फ्रॅक्चर झाल्याचे हरीशने फिर्यादीत म्हटले आहे. या भांडणात सोन्याची चैनही गायब झाल्याचे त्याने नमूद केले आहे. या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *