
झाडीचे उद्योगपती प्रकाशचंद्र पाटील यांना युगांडा सरकारचे निमंत्रण
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील झाडी येथील रहिवासी, माजी पोलीस अधिकारी तथा गुजरातमधील उद्योगपती प्रकाशचंद्र पाटील यांना युगांडामधील व्यवसाय व गुंतवणुकीच्या संधींचा आढावा घेण्यासाठी १७ जुलै रोजी युगांडाच्या पंतप्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हे निमंत्रण युगांडा सरकारचे आपत्ती निवारण, आपत्ती पूर्वतयारी व निर्वासित विभागाचे मंत्री सॅम इंगोला यांनी पाठविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंत्री सॅम इंगोला यांनी पाठविलेल्या निमंत्रणपत्रात प्रकाशचंद्र पाटील यांनी औषधनिर्माण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या व्यावसायिक अनुभवाचा आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाचा युगांडा सरकारने गौरव करत त्यांना या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, विकसनशील देश म्हणून युगांडा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी खुला असून विविध क्षेत्रांत गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. विशेषतः निर्वासित आणि स्थानिक समुदायांचा विकास, रोजगारनिर्मिती तसेच युगांडाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी परस्पर सहकार्याच्या अनेक शक्यता असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
१७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता युगांडाच्या पंतप्रधान कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत गुंतवणुकीच्या विविध संधींचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच संबंधित भागधारकांशी चर्चा, संभाव्य व्यावसायिक भागीदारी, उद्योगविस्तार आणि भारत–युगांडा यांच्यातील आर्थिक सहकार्याच्या विविध पैलूंवर विचारविनिमय होणार आहे. निमंत्रणपत्राच्या शेवटी, बैठकीसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही अतिरिक्त सहकार्याची तयारी असल्याचे नमूद करत, “आपली त्या दिवशी प्रत्यक्ष भेट होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत,” असे मंत्री सॅम इंगोला, मंत्री, आपत्ती निवारण, आपत्ती पूर्वतयारी व निर्वासित विभाग, युगांडा सरकार यांनी म्हटले आहे. झाडीसारख्या ग्रामीण भागातील व्यक्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा महत्त्वाच्या बैठकीचे निमंत्रण मिळाल्याने अमळनेर तालुक्यासह जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Leave a Reply