
मुलाला शौचालयात घेऊन जाते म्हणत घराबाहेर पडलेली महिला पाच वर्षीय मुलासह बेपत्ता
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय महिला आपल्या पाच वर्षीय मुलाला सार्वजनिक शौचालयात घेऊन जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर मारवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ जुलै रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता संबंधित महिला आपल्या पाच वर्षीय मुलाला सार्वजनिक शौचालयात घेऊन जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.
महिलेच्या आईने तातडीने तिच्या मुलाला याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी गावात, अमळनेर शहरात तसेच विविध नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र सर्वत्र शोध घेऊनही महिला व तिच्या मुलाचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर महिलेच्या भावाने मारवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून महिला व तिच्या मुलाचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित महिला व तिच्या मुलाबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तातडीने मारवड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांचा लवकरात लवकर शोध घेणे शक्य होईल.

Leave a Reply