
मान्सूनच्या जोरावर खरीपाची अमळनेर तालुक्यात ४८ हजार ४१० हेक्टरवर पेरणी
अमळनेर (प्रतिनिधी) यंदाच्या मान्सूनने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर अमळनेर तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत तालुक्यात ४८ हजार ४१० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड पूर्ण झाली असून, त्यामध्ये कपाशी आणि मका या पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. तालुक्यात आतापर्यंत १४१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा मान्सूनचे आगमन तुलनेने वेळेत झाले असले तरी सुरुवातीला पावसाने काहीशी उघडीप दिली होती. त्यामुळे पेरणीबाबत शेतकरी संभ्रमात होते. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आणि शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेगाने पूर्ण केली. तालुक्यात यंदाही कपाशी आणि मक्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही पिकांचे क्षेत्र इतर पिकांच्या तुलनेत लक्षणीय आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांची उगवण चांगली होऊन वाढीस पोषक वातावरण तयार होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, पावसात दीर्घ खंड पडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या बहुतांश शेतांमध्ये पिकांची उगवण सुरू झाली असून शेतकरी तणनियंत्रण, खत व्यवस्थापन तसेच कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजनांच्या नियोजनाला लागले आहेत. कृषी विभागानेही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी कामे करण्याचे, पिकांची नियमित पाहणी करण्याचे आणि आवश्यकतेनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
अशी झाली आतापर्यंत पेरणी
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात आतापर्यंत कपाशी – ३४ हजार ८६ हेक्टर, मका – १२ हजार ५६ हेक्टर, भुईमूग – ६३५ हेक्टर, तूर – ५०८ हेक्टर, बाजरी – २३७ हेक्टर, ज्वारी – १२१ हेक्टर, सोयाबीन – ११६ हेक्टर, तीळ – २ हेक्टर तसेच इतर पिकांची लागवड झाली आहे. अशाप्रकारे खरीप पेरणीचे एकूण क्षेत्र ४८ हजार ४१० हेक्टर इतके झाले आहे.

Leave a Reply