
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सफाई कामगारांना सकाळीच कामे द्या
कामगार संघटनांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन 
अमळनेर (प्रतिनिधी) उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका लक्षात घेता न.प. तील सर्व गटार सफाई कामगार व झाडू कामगार यांना सकाळच्या सत्रातच नेमणूक द्यावी, अशी मागणी नगरपालिका कामगार संघटनेच्या वतीने पालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात आरोग्य निरीक्षक यांना आदेश करावेत असेही निवेदनात म्हटले आहे.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना,अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ आणि नगरपालिका कामगार युनियन,शाखा अमळनेरच्या वतीने सदरचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की सध्या जळगांव जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून अमळनेर शहरात व तालुक्यात उन्हाळा कडक राहत असल्याने मार्चपासून तिव्र उन-उष्णता असते. सदरची उष्णता दुपारचे १२ वाजे पासून ते ५ वाजेपर्यंत मे अखेरपर्यंत असते. अश्या परिस्थीतीत दुपारी २ वाजेला सफाई कामगारांना हजेरीवर व कामाला बोलविले जाते. त्यामुळे दुपारी सफाई काम करतांना कामगारांना उष्णतेचा त्रास होतो व त्यामुळे बरेचसे कर्मचारी हे आजारी पडतात व उष्माघाताचे उपचार घ्यावे लागतात. अतिशय जास्त तापमान असल्यास उष्माघाताचे बळीही ते ठरू शकतात, सदरचा धोका होवू नये म्हणून सकाळच्या व दुपारच्या सत्रातील कामासाठी एका सत्रातच नेमणूक द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील यासंदर्भात आदेश पारित केलेले असल्याचे यात म्हटले आहे. सदर निवेदनावर विविध संघटनांचे रघुनाथ मोरे, विकास जाधव,मुकेश बिऱ्हाडे, नवल बि-हाडे,रुपचंद पारे,गुरुचरण पवार, विनोद जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply