
अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीचा निवडणूक जाहीर, ८ मार्च रोजी मतदान
नामनिर्देशन पत्राची विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून ४ फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्राची विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ८ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
उमेदवारांना दिनांक १० फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,अमळनेर यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र खरेदी व दाखल करता येणार आहेत. दरम्यान एकूण १३ जागांसाठी ही निवडणूक होत असून यात सर्वसाधारण ८, अनु जाती-जमाती १, वि.जा.भ.ज.व विमाप्र १, इ.मा.व.१,महिला २ अशा एकूण १३ जागांचा समावेश आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्र दररोज दुपारी ३.३० वाजता प्रसिद्ध करण्यात येतील. नामनिर्देशन पत्राची छाननी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक कार्यालयात होईल. तर विधिग्राह्य नामनिर्देशन पत्रांची सूची १२ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता निवडणूक कार्यालयात प्रसिद्ध होईल..नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत १२ ते २६ फेब्रुवारीपर्यंत असून या मुदतीत सकाळी ११.३० ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक कार्यालयात अर्ज मागे घेता येईल. पात्र उमेदवारांना २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता निवडणूक कार्यालयात चिन्ह वाटप होणार आहे. याचवेळी अंतिम विधिग्राह्य नामनिर्देशनांची यादी प्रसिद्ध होईल. यानंतर आवश्यक असेल तर ८ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. याचे स्थळ नंतर जाहीर केले जाईल. तर मतदान आटोपल्यावर याच दिवशी दुपारी ४.३० वाजेनंतर मतमोजणी होऊन त्यानंतर निकाल घोषित केला जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी.महाजन यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9403390738 यावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply