अमळनेर तालुक्यात तीन दिवसांत तिघांचा मृत्यू; दोघांनी गळफास तर एकाने केले विष प्राशन

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यात तीन दिवसांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्या असून, दोघांनी गळफास घेऊन तर एकाने विष प्राशन करून जीवन संपविले. या तिन्ही घटनांप्रकरणी मारवड पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील धार येथील पंडित राघो पाटील (वय ७६) यांनी दि. ३० रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी झोक्याच्या दोरीने गळफास घेतला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर सुखदेव पंडित पाटील यांनी मारवड पोलिस स्टेशनला खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत. दुसरी घटना तालुक्यातील खर्दे येथे घडली. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील मूळ रहिवासी आणि सध्या खर्दे येथे वास्तव्यास असलेले सतीलाल राजधर भिल (वय ३०) यांनी दि. २९ रोजी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास फुलसिंग पोपट भिल यांच्या बंद घरातील लोखंडी ग्रीलला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना घडली. याप्रकरणीही मारवड पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत. तिसरी घटना तालुक्यातील एकतास येथे घडली. अंकित विश्राम पाटील यांनी दि. २८ रोजी विष प्राशन केले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी नर्मदा फौंडेशनमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने दि. २९ रोजी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत. या तिन्ही घटनांमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, मारवड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *