गटारीत दगड टाकल्याच्या कारणावरून मारहाण; लाकडी दांडक्याच्या वारात एक जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) : घरासमोरील गटारीत दगड टाकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी एका व्यक्तीला चापट-बुक्क्यांनी मारहाण करून लाकडी दांडक्याने वार केल्याची घटना तालुक्यातील सडावण येथे दि. २८ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत नामदेव केशव पाटील हे जखमी झाले असून, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सडावण येथील नामदेव केशव पाटील यांनी अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २८ रोजी सकाळी कैलास काशिनाथ पाटील आणि सुखदेव कैलास पाटील हे त्यांच्या घरासमोर आले आणि शिवीगाळ करू लागले. यावेळी नामदेव पाटील यांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, ‘तू आमच्या घरासमोरील गटारीत दगड का टाकला?’ असा आरोप दोघांनी केला. त्यावर नामदेव पाटील यांनी आपण दगड टाकलेला नसून विनाकारण वाद करू नका, असे सांगितले. मात्र, त्यानंतर कैलास काशिनाथ पाटील आणि सुखदेव कैलास पाटील यांनी त्यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्यांच्या हाताच्या मनगटावर दोन वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नामदेव केशव पाटील यांच्या फिर्यादीवरून कैलास काशिनाथ पाटील आणि सुखदेव कैलास पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११७(२), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *