भूमी सुपोषण जनजागर रथातून अमळनेर तालुक्यातील सहा मंडळांतील 156 गावांत होणार जनजागृती

गणपती बाप्पांचे स्तवन करीत मंत्रोच्चारासह  विधिवत पूजा-अर्चेसह श्रीफळ वाढवून पूजन

 

अमळनेर (प्रतिनिधी) भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागर रथाचे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी गणपती बाप्पांचे स्तवन करीत मंत्रोच्चारासह विधिवत पूजा-अर्चेसह श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्य अतिथी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी हिरवा झेंडा दाखवत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जनजागर रथ मार्गस्थ करण्यात आला.  कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

अमळनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, अमळनेर कृषी विभागाचे मंडल अधिकारी अविनाश खैरनार, उप कृषी अधिकारी योगेश वंजारी, दिनेश पाटील, अमोल कोठावदे तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रथपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी समाजातील विविध घटकांतील मान्यवर, तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी व मंदिरातील भाविक उपस्थित होते. या अभियान चळवळीचा जागर उद्या शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 पासून अमळनेर तालुक्यातील सहा मंडळांतील 156 गावांना भेट देत या रथाच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे बहुमूल्य सहकार्य लाभले असून, 6 मंडळांतील एका प्रमुख गावात अशा एकूण 6 गावांत भूमीमाता पूजनाचा कार्यक्रमही होणार आहे.

सर्वांसाठी जीवनदायिनी असलेल्या भूमीमातेचा चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याला जन्मदिवस असतो. त्या अनुषंगाने अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 19 मार्च 2026 या मंगलदिनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ श्री मंगळग्रह मंदिरातून करण्यात आलेला आहे. याप्रसंगी गावागावांतून आलेल्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भूमीमातेचे विधिवत मंगलमय पूजन करण्यात आले. तसेच मंत्री महोदयांनी प. पू. स्वामी नृसिंह विजयेंद्र सरस्वतीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भागैयाजी, अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोज सोलंकी, उपाध्यक्ष डॉ. गजाननजी डांगे, पद्मश्री तथा कृषक शास्त्रज्ञ सुभाषजी शर्मा, महाराष्ट्रातील मंदिर महासंघाचे संयोजक सुनील घनवट, केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांकडून जैविक शेती उत्पादनाचा संकल्प करवून तशी शपथही त्यांना देवविली. याचवेळी मंत्री चौहान यांच्यासह विविध महानुभावांनी या राष्ट्रीय अभियानाच्या चळवळीत समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन अन्नदात्या भूमीला आई मानून जैविक शेती करण्याचे आवाहनही यावेळी केलेे होते. त्याचाच पुढील भाग म्हणून हे अभियान आता गावागावापर्यंत पोहोचविले जाणार आहे.

 

आजपासून गावागावांत जनजागृती

 

दि. 11 एप्रिल 2026 पासून भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीचा जनजागर रथ गावागावांत पोहोचणार आहे. यामध्ये अमळनेर तालुक्यातील  जनजागर अभियानाची सुरूवात मंगरूळ या गावातून केली जाणार आहे. यावेळी जनजागर रथातून ध्वनिक्षेपकावरून भूमी सुपोषण अभियानाचे महत्त्व, कार्य व भूमी सुपोषण करण्यासंदर्भात सविस्तर माहिती तसेच अन्नदात्या भूमीमातेचे महत्त्व पटवत जैविक शेतीला प्रोत्साहन देणे कसे महत्त्वपूर्ण आहे, हे शेतकरी बांधवांना समजावले जाणार आहे. दिवसभरात साधारपणे एकूण 10 गावांना जनजागर रथ भेट देणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *