
वर्णेश्वर मंदिराजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील बोरी नदीकाठी असलेल्या वर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात अंदाजे 60 वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार, दि. 10 एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मंदिराजवळील परिसरात स्थानिक नागरिकांना महिलेचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. माहिती मिळताच अमळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत महिलेचा बांधा सळपातळ असून अंगात निळ्या रंगाचे ब्लाऊज, आकाशी रंगाची साडी व पांढऱ्या रंगाचा परकर आहे. पायात मेहंदी रंगाची चप्पल असून केस काळे आहेत. कानात पिवळ्या धातूचे कर्णफूल, गळ्यात काळ्या मण्यांची पोत व त्यात पिवळ्या धातूचे रामफूल, नाकात फुली, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि उजव्या हाताच्या बोटात तांब्याची अंगठी आहे. तिच्यासोबत तपकिरी रंगाचे पाकीटही आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सदर महिलेची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन अमळनेर पोलिसांकडून करण्यात आले आहे. संबंधित महिलेबाबत माहिती असल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी कळविले आहे.

Leave a Reply