स्व. लोकनेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे अमळनेर तालुक्यात वितरण

अमळनेर (प्रतिनिधी)  महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांमध्ये अधिकृतपणे आणि आदराने साजरी करण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी तालुक्यातील विविध कार्यालयांना स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांची भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि संस्थांमध्ये साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या विकासात, कृषी क्षेत्राच्या प्रगतीत, प्रशासनातील योगदानात तसेच अमळनेरच्या पाडळसरे धरणासह विविध विकासकामांमध्ये स्व. अजितदादा पवार यांनी दूरदृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि प्रत्येक कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा सन्मानाने स्थापित करून जयंती साजरी करता यावी, या हेतूने अशोक आधार पाटील यांनी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, प्रांताधिकारी कार्यालय तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांना प्रत्यक्ष भेट देऊन प्रतिमांचे वितरण करत उपक्रमाची सुरुवात केली. यावेळी अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांच्यासह सहकारी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये तसेच विविध संस्थांना स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमा सप्रेम भेट म्हणून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यासोबतच संबंधितांनी आपल्या कार्यालयात किंवा संस्थेत ही प्रतिमा स्वीकारून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात व आदरपूर्वक साजरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करणारे पत्रही अशोक आधार पाटील यांनी दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत व कौतुक केले जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *