जुनोने येथील बेपत्ता तरुणाचा पाटचारीत आढळला मृतदेह; आत्महत्येचा अंदाज

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच होणार स्पष्ट 

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जुनोने येथे २७ फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह १ मार्च रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पाटचारीत तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत तरुणाचे नाव दत्तू लोटन पाटील (वय ३५) असे असून तो २७ फेब्रुवारी रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. नातेवाईक व ग्रामस्थांकडून विविध ठिकाणी चौकशी करण्यात येत होती.

दरम्यान, १ मार्च रोजी दुपारी काही नागरिकांना पाटचारीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. ही माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. ओळख पटविल्यानंतर तो दत्तू पाटील यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.  या घटनेमुळे जुनोने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *