
चारुशीला महाजन यांना ‘आदर्श अधिकारी कर्मचारी पुरस्कार’
अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी विकास विभाग, प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत कार्यरत अधिक्षिका आयुष्यमती चारुशीला महाजन यांना उत्कृष्ट व समर्पित सेवेसाठी ‘आदर्श अधिकारी कर्मचारी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला.
या गौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, आदिवासी विकास विभाग यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, मिलिंद पाईकराव व मुसळे सर उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून सहाय्यक आयुक्त (आदिवासी विकास, नाशिक) राजेंद्र हिवाळे यांची विशेष उपस्थिती होती.
चारुशीला महाजन यांचा सेवाप्रवास आव्हानात्मक राहिला आहे. आदिवासी विकास विभागातील अधिक्षिका पदाची जबाबदारी जोखमीची असून, २४ तास आणि सातही दिवस सेवेसाठी बांधील असलेल्या या पदावर कार्यरत असताना त्यांनी पहिल्या दिवसापासून वसतिगृहाला आपले घर मानून निरंतर सेवा दिली. त्यांनी नोकरीची सुरुवात पिंगळवाडे आश्रमशाळेतून केली. सध्या त्या दहिवद येथे कार्यरत असून, आश्रमशाळेतील मुलींची दक्षता व सुरक्षितता याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष असतो. वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंग बाजूला सारून त्यांनी कर्तव्यभावनेला प्राधान्य दिले. ‘नोकरी मिळणे सोपे पण ती प्रामाणिकपणे टिकवणे कठीण’ हा वसा जपत केलेल्या त्यांच्या कार्याची शासनाने दखल घेतली आहे. त्यांच्या या यशात संदानशिव परिवारातील आई व दादा तसेच समाजकार्याची आवड असणारे त्यांचे पती दीपक संदानशिव यांच्या खंबीर साथीचा मोठा वाटा असल्याचे परिवाराकडून सांगण्यात आले.
दहिवद शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नितीन शिरसाट, सर्व शिक्षकवृंद आणि इतर कर्मचाऱ्यांनी चारुशीला महाजन यांचे अभिनंदन केले. परिवारातील सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत मिळालेला हा सन्मान त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. परिवर्तनवादी महामानव व महामातांच्या विचारांतून त्यांचा समाजकार्याचा वसा असाच पुढे सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply