
अमळनेरात बुधवारपासून ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’चे भव्य प्रदर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे बुधवार दि. ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या तीन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या ७० हून अधिक विभागांच्या योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासकामांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील फ्रेंड्झ एक्झिबिशन अँड प्रमोशन या संस्थेच्या वतीने कलागुरु मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार स्मिता उदय वाघ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांचे दर्शन या प्रदर्शनातून घडणार आहे. गतवर्षी जळगावच्या जी. एस. ग्राउंडवर हे प्रदर्शन झाले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. देशात पहिल्यांदाच एकाच जिल्ह्यात दुसऱ्यांदा हे प्रदर्शन होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शन दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
कृषी व फलोत्पादन, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग व विमा, आरोग्य व निरोगी जीवनशैली, वाणिज्य व व्यापार, ऊर्जा व पर्यावरण, शिक्षण, ग्राहक जागरूकता, माहिती व दळणवळण, वाहतूक, रेल्वे, पर्यटन, हस्तकला व हातमाग, रसायने व खते आदी क्षेत्रांतील शासकीय योजना, आधुनिक तंत्रज्ञान व विकासकामांची माहिती प्रदर्शनात मिळणार आहे. यासाठी केंद्र व राज्यातील विविध विभागांचे आयएएस अधिकारी, संचालक व शास्त्रज्ञ देशभरातून येणार आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक व उद्योजकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार स्मिता उदय वाघ यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला अखिला श्रीनिवासन, दीपकसिंह मेहता, साक्षी सैनी, दत्ता थोरे, संतोष पवार आदी उपस्थित होते.
उद्घाटन बुधवारी सकाळी ११.३० वाजता
या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा बुधवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता खासदार स्मिता उदय वाघ यांच्या हस्ते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संयोजक संस्थेचे चेअरमन आनंद पाल यांनी दिली.

Leave a Reply