
बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्याचा तगादा; दहावीच्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी भाऊ-बहीणीवर गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कावपिंप्री येथील दहावीच्या विद्यार्थिनी अनुष्का रवींद्र सपकाळे हिच्या आत्महत्येप्रकरणी दोघा भाऊ-बहीणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्याचा तगादा लावून मानसिक त्रास दिल्यामुळे अनुष्काने आत्महत्या केल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीतून समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कावपिंप्री येथील माध्यमिक शाळेत दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का रवींद्र सपकाळे हिने ५ सप्टेंबर रोजी दुपारी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे, त्याच दिवशी सकाळी शाळेत झालेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात तिने शिक्षिकेची भूमिका साकारली होती. या प्रकरणी मयत अनुष्काची आजी शोभाबाई बळीराम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे एक महिन्यापूर्वी अनुष्काने आजीला सांगितले होते की, त्यांच्या घरामागे राहणारा स्वप्नील जयवंतराव पवार (मूळ रा. चौगाव, ता. चोपडा, ह. मु. कावपिंप्री) हा तिला ‘तू मला आवडतेस, तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव’ असे म्हणत त्रास देत होता. तसेच त्याची बहीण रुपाली आनंद अहिरे हीदेखील अनुष्कावर स्वप्नीलसोबत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत होती. याबाबत अनुष्काने आजीला सांगितले होते की, या दोघांना समजावून सांगा; अन्यथा मी स्वतःचे काहीतरी करून घेईन. त्यानंतर आजी शोभाबाई बळीराम सोनवणे यांनी स्वप्नील जयवंतराव पवार व रुपाली आनंद अहिरे यांना अनुष्का लहान आहे, तिला मानसिक त्रास देऊ नका, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही दोघांकडून अनुष्काला त्रास देणे सुरूच होते. तसेच त्यांनी आजीलाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ५ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शोभाबाई भरवस येथे अंत्ययात्रेसाठी गेल्या होत्या. त्यावेळी अनुष्काने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. त्यानंतर काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्वप्नील अनुष्काच्या घरात घुसला होता, तर रुपाली अहिरे अनुष्काला शिवीगाळ करत होती. या प्रकारामुळे अनुष्काला दोघांकडून त्रास दिला जात असल्याचे स्पष्ट झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शोभाबाई बळीराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील जयवंतराव पवार आणि रुपाली आनंद अहिरे या भाऊ-बहीणीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०८, ३५१ (२) आणि ३५२ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे करीत आहेत.

Leave a Reply