
अमळनेर शहराचे तापमान कमी करण्यासाठी १८ हजार झाडे लावणार
अमळनेर (प्रतिनिधी) शहराचे वाढते तापमान कमी करण्यासह अमळनेर शहर अधिक हिरवेगार करण्यासाठी अमळनेर नगरपरिषद आणि महिला हौसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक अमळनेर नगरपरिषदेच्या सभागृहात झाली.
नगरपरिषदेच्या सर्व विभागांतील नगरसेवक, महिला हौसिंग ट्रस्ट आणि भागधारक सल्लागार यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. महिला हौसिंग ट्रस्टने हरित व निळा विकास आराखड्यानुसार अमळनेर शहरात गेल्या दोन वर्षांपासून १८ हजार झाडे लावली असून, या वृक्षारोपणामुळे शहराचे तापमान कमी होण्यास मदत होणार आहे. याच उपक्रमाला पुढे व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिला हौसिंग ट्रस्ट आणि अमळनेर नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण सुरू आहे. यासाठी शहरातील मोकळ्या जागा, जलसाठे, भौगोलिक क्षेत्रे आणि रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या जागांचे नकाशांकन करण्यात आले आहे. अमळनेर शहरातील १८ विभागांमध्ये योग्य ठिकाणी वृक्षारोपण करता यावे, यासाठी संबंधित विभागांतील नगरसेवकांशी चर्चा करून त्यांच्या विभागात वृक्षलागवडीसाठी उपलब्ध असलेल्या योग्य जागांची माहिती घेण्यात आली. या बैठकीस अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, आरोग्य विभागाचे अधिकारी जाधव, मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, रोटरी क्लबचे सदस्य तसेच सर्व विभागांतील नगरसेवक उपस्थित होते. शहराचे तापमान कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यासह अमळनेरला अधिक हिरवेगार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Reply