
तिरुपती बालाजी नमो गार्डन’पासून विकासकामांना सुरुवात : शिरीष चौधरी
ताडेपुराचा विकास पळवून मध्यवर्ती शहरात नेण्याचा निर्णय नेमका कुणी घेतला? : नगरसेविका शोभाबाई गढरे

अमळनेर (प्रतिनिधी) चांगल्या कामांना वेळ लागतो. विरोधकांनी आमच्यावर टीका केली; मात्र आम्ही संयम ठेवून पाणीपुरवठा तीन दिवसाआड नियमित सुरू केला. प्रभाग क्रमांक आठमध्ये लहान मुले, तरुण, महिला आणि वृद्धांसाठी तब्बल एक कोटी रुपयांच्या ‘तिरुपती बालाजी नमो गार्डन’पासून विकासकामांना सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले. नमो गार्डनच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
प्रभाग क्रमांक आठमध्ये अत्याधुनिक योगा हॉल, सुरक्षारक्षक खोली, वृद्धांना बसण्यासाठी शेड व बाक, खुली व्यायामशाळा, कार्यक्रमांसाठी व्यासपीठ, फिरण्यासाठी पाथवे, विद्युत व्यवस्था, मुलांसाठी खेळणी तसेच मध्यभागी तिरुपती बालाजीचा पुतळा अशा विविध सुविधांसह हे नमो गार्डन साकारण्यात येत आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले, ‘‘या प्रभागातील नागरिकांनी मोठ्या फरकाने अपूर्वा चौधरी आणि नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना निवडून दिले आहे. त्यामुळे नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विरोधक गार्डनची गरज काय, असा सवाल करतात; मात्र राजकीय क्षेत्रात मैदान अपूर्ण पडू लागल्याने नेत्यांना शांत करण्यासाठी नमो गार्डन होत आहे. विरोधकांना कामातून उत्तर दिले जाईल.’’
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर म्हणाले, ‘‘तिरुपती बालाजी सोन्याचा देव मानला जातो. त्या नावाचे गार्डन येथे होत आहे म्हणजे सोन्यासारखा विकास होत आहे. घरात काम करणाऱ्या महिला, वृद्ध, नागरिक आणि मुलांना चांगल्या आरोग्यासाठी नैसर्गिक वातावरण व खेळती हवा आवश्यक आहे. या गार्डनसाठी पाच कोटी रुपयांचे बक्षीस आहे, तेही आपल्याला जिंकायचे आहे.’’
यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि पी. डी. साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार नगरसेविका अपूर्वा चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमास माजी आमदार शिरीष चौधरी,नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर,उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, बांधकाम सभापती साहेबराव पवार, शिक्षण सभापती नावेद शेख, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील, शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील, गटनेते पंकज चौधरी, अपक्ष गटनेते महेश देशमुख, अनिल महाजन, श्रीराम चौधरी, मोहन सातपुते, प्रा. भरतसिंग परदेशी, दिपक चौगुले, बाळासाहेब संदांनशीव, सुरज परदेशी, मुन्ना शर्मा, पंकज भोई, मंगलाताई देसले, शहर प्रमुख भरत पवार, विलास कंखरे आणि युवासेनेचे राहुल कंजर उपस्थित होते.
ताडेपुराचे ‘नमो गार्डन’ पळवून मध्यवर्ती शहरात नेल्याने संताप
ताडेपुरा परिसरासाठी प्रस्तावित असलेले ‘नमो गार्डन’ मध्यवर्ती शहरात नेऊन अन्याय केल्याचा आरोप नगरसेविका शोभाबाई गढरे यांनी केला आहे. ताडेपुराचे ‘नमो गार्डन’ पळवून मध्यवर्ती शहरात नेऊन त्याचे भूमिपूजन करण्यात आल्याने पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी, ताडेपुरा आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ताडेपुरा येथे गार्डन होण्यास सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनीच विरोध केला होता. त्यानंतर प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष दुर्गेश पाटील यांच्यासह नागरिकांनी ताडेपुराच्या विकासासाठी आवाज उठविला होता. आता पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी, ताडेपुरा आणि परिसरातील नागरिकांनी या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. ‘‘ताडेपुराचा विकास पळवून मध्यवर्ती शहरात नेण्याचा निर्णय नेमका कुणी घेतला? या निर्णयाचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारल्याशिवाय जनता शांत बसणार नाही,’’ असा इशारा नगरसेविका शोभाबाई गढरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply