शेतरस्त्याच्या वादातून ७० पोते बाजरी जाळली, जवखेडा येथे दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडा येथे शेतरस्त्याच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्याच्या शेतातील ६० ते ७० पोते बाजरी जाळून टाकल्याची घटना ५ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आधार देवचंद पाटील (वय ६५, रा. जवखेडा) यांनी त्यांच्या गट क्रमांक ६८२/२ मधील एक हेक्टर १४ आर क्षेत्रात बाजरीचे पीक घेतले होते. गावातीलच सुभाष नथु पाटील आणि गुलाब मधुकर पाटील यांच्यासोबत शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. ५ मे रोजी या वादाचा निकाल आधार पाटील यांच्या बाजूने लागला होता.

शेतात काढून ठेवलेली ६० ते ७० पोत्यांची बाजरीची गंजी आधार पाटील सांभाळत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ते जेवणासाठी घरी आले. गावात कार्यक्रम असल्याने पाहुण्यांची वर्दळ होती, त्यामुळे त्यांना शेतात परत जाण्यास उशीर झाला. रात्री अकराच्या सुमारास ते पुन्हा शेतात गेले असता त्यांना शेतातील झोपडी आणि बाजरीची गंजी आगीत जळताना दिसली. तसेच गावातील सुभाष पाटील आणि गुलाब पाटील हे घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला आहे. यानंतर आधार पाटील यांनी तातडीने मुलगा संदीप पाटील तसेच दादाभाऊ पाटील, विकेश माळी, मनोज पाटील, सचिन पाटील आणि सुरेश पाटील यांना बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने गावातून जेसीबी मशीन मागवून बाजरीची गंजी मोकळी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही ६० ते ७० पोते बाजरी जळून खाक झाली.

घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील प्रकाश कुऱ्हाडे यांना देण्यात आली. त्यानंतर आधार पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२६(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *