राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या इशिका खैरनारचा झेंडा; ‘नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड’ने केले सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलमधील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी इशिका शरद खैरनार हिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत ‘नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड’ पटकावला असून शाळेसह संपूर्ण अमळनेरचे नाव उज्ज्वल केले आहे.

दि. १३ व १४ जून २०२६ रोजी विदर्भ केसरी खासदार रामदासजी तडस इंडोर स्टेडियम, देवळी (जि. वर्धा) येथे स्पोर्ट्स शोतो कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया संलग्नित स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, वर्धा यांच्या वतीने राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. इशिकाने स्पर्धेतील काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विशेष यश संपादन केले. तिच्या दमदार कामगिरीची दखल घेत आयोजकांकडून तिला ‘नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले. इशिकाच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, मुख्याध्यापक जितेंद्र सिंह, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी चेअरमन बोहरा यांनी इशिकाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील पुढील वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यात ती आणखी मोठी यशाची शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त केला.

अल्पवयात राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल तसेच संपूर्ण अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इशिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *