अमळनेर बाजार समितीत लिलाव शेडवर गुमास्त्याचा हृदयविकाराने मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुमास्ता नितीन केशव पाटील (वय ५०, रा. ढेकू अंबासन) यांचा लिलाव शेडवर काम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नितीन पाटील हे नेहमीप्रमाणे लिलाव शेडवर लिलाव प्रक्रिया पार पाडत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांना याची माहिती दिली. व्यापाऱ्यांनी त्वरित त्यांना डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले.

प्राथमिक तपासणीनंतर हृदयविकाराचा झटका अत्यंत तीव्र असल्याचे लक्षात आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

नितीन पाटील हे अत्यंत मनमिळावू व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जात होते, अशी भावना त्यांच्या सहकारी गुमास्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी १४ मार्च रोजी त्यांच्या मुलीचे लग्न पार पडले होते. त्यामुळे या घटनेने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे बाजार समितीतील व्यापारी, शेतकरी व कर्मचारी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *