
अमळनेर तालुक्यात पाच ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, दोन ठिकाणी थेट सरपंच निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये चोपडाई तसेच अंतुर्ली-रंजाणे या गावांमध्ये थेट सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकांकडे विशेष लक्ष लागले आहे.
अंतुर्ली-रंजाणे येथील लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते, तर चोपडाई येथील सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. दोन्ही ठिकाणच्या सरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे ही पदे रिक्त झाली असून आता थेट जनतेतून निवड केली जाणार आहे. याशिवाय मुंगसे येथील प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचित जमाती स्त्री या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने पुन्हा निवडणूक होत आहे. तसेच प्रभाग क्रमांक १ मधील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराच्या निधनामुळे तेथेही निवडणूक होणार आहे. नंदगाव-लडगाव येथे प्रभाग १ मधील सर्वसाधारण स्त्री उमेदवाराने निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र ठरून पद रिक्त झाले होते. डांगर बुद्रुक येथे प्रभाग १ मधील सर्वसाधारण स्त्री व प्रभाग ३ मधील सर्वसाधारण सदस्य पदे उमेदवारांच्या निधनामुळे रिक्त झाली आहेत. चोपडाई येथे प्रभाग २ मधील सर्वसाधारण व प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्यांनी राजीनामा दिल्याने ती पदेही रिक्त झाली आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ७ ते १३ एप्रिल (सुटीचे दिवस वगळून) अशी आहे. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ एप्रिल रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास २९ एप्रिल रोजी पुनर्मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Leave a Reply