
किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांची शासनाकडून अवहेलना? महागडी इम्युनोसप्रेसंट औषधे शासकीय योजनेतून पूर्ववत मिळावीत
पेन्शनसह विविध मागण्यांसाठी किडनी वॉरियर्स फाऊंडेशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) : किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेली औषधे शासकीय आरोग्य योजनांमधून पूर्वीप्रमाणे मोफत उपलब्ध करून द्यावीत, तसेच या रुग्णांना आर्थिक आधार देण्यासाठी पेन्शन सुरू करावी, अशी मागणी किडनी वॉरियर्स फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
राज्यातील किडनी प्रत्यारोपण झालेल्या हजारो रुग्णांना यापूर्वी आयुष्मान भारत योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत इम्युनोसप्रेसंट औषधे मोफत उपलब्ध होत होती. प्रत्यारोपणानंतर शरीराने प्रत्यारोपित किडनी नाकारू नये यासाठी ही औषधे नियमित घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे या औषधांचा पुरवठा बंद किंवा मर्यादित झाल्यास रुग्णांसमोर मोठे आर्थिक आणि आरोग्यविषयक संकट निर्माण होऊ शकते, अशी चिंता फाऊंडेशनने व्यक्त केली आहे.
किडनी प्रत्यारोपणानंतर दीर्घकाळ औषधोपचार सुरू ठेवावे लागतात. या औषधांचा खर्च अनेक सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारा नसल्याने शासकीय योजनेतून औषधांचा पुरवठा पूर्ववत करणे आवश्यक असल्याचे फाऊंडेशनचे म्हणणे आहे. औषधांचा नियमित डोस चुकल्यास प्रत्यारोपित किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याने शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी राहण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दिव्यांग प्रवर्गात समावेश करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच तेलंगणा आणि राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातील किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना दरमहा ५ हजार रुपयांची पेन्शन सुरू करावी, अशी मागणीही फाऊंडेशनने केली आहे. औषधांचा सातत्यपूर्ण खर्च, नियमित वैद्यकीय तपासण्या आणि प्रत्यारोपणानंतरच्या उपचारांचा आर्थिक भार लक्षात घेता अशा रुग्णांना सामाजिक सुरक्षा देणे गरजेचे असल्याचे फाऊंडेशनने म्हटले आहे.
किडनी प्रत्यारोपणानंतरचे आयुष्य हे रुग्णांसाठी आधीच मोठ्या संघर्षाचे असते. त्यामुळे जीवनावश्यक औषधांचा शासकीय योजनांमधून होणारा पुरवठा पूर्ववत करून रुग्णांना दिलासा द्यावा, तसेच पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी किडनी वॉरियर्स फाऊंडेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply