
गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्यांचा अमळनेरमध्ये गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) : माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या सामाजिक, राजकीय आणि पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा अमळनेरमध्ये गौरव करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहा’त यंदाचे राज्यस्तरीय साथी गुलाबराव पाटील स्मृती राजकीय पुरस्कार जनता दलाचे नेते व मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना, तर सामाजिक पुरोगामी पुरस्कार माजी आयआरएस अधिकारी व जलसंवर्धन तज्ज्ञ उज्वलकुमार चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ ऑगस्ट रोजी या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले. लाल टोपी, बागायतदार रुमाल, २१ हजार रुपये रोख आणि ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, किरण पाटील, डॉ. शकील जलालोद्दीन शेख, भास्कर बोरसे, मगन पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील, सुनील पाटील यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साथी संदेश वक्तृत्व स्पर्धेत प्रशांत चिंतामण बेले प्रथम
साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहानिमित्त घेण्यात आलेल्या साथी संदेश वक्तृत्व स्पर्धेत राज्यभरातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रशांत चिंतामण बेले (संभाजीनगर) याने प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी संजय मोरणकार (मालेगाव) हिने द्वितीय, तर रुपेश जयंत पाटील (जळगाव) याने तृतीय क्रमांक मिळविला. कल्याणी संदीप पाटील (अमळनेर) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. साहित्य व नाट्य क्षेत्रातील दिग्गज प्राध्यापक राजेंद्र देशमुख, कविवर्य बी. एन. चौधरी आणि संजय नेरकर यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व साथी संदेश वक्तृत्व करंडक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर, जे. एस. पाटील, मोनिका पाटील आणि शारदा उंबरकर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी मानले.
विद्यार्थ्यांना शमिभा पाटील यांचा वैचारिक संदेश
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारलिंगी समाजाच्या अभ्यासक शमिभा पाटील होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सोशल मीडिया व इतर माध्यमांतून मिळणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले.
त्या म्हणाल्या, “सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणारे सर्वच मेसेज खरे नसतात. मेसेजची खात्री करावी, प्रसंगी लायब्ररीत जाऊन संदर्भ शोधावा, त्यातून आपली वैचारिक बैठक तयार होईल. देशातील लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी ‘जेन-झी’वर (Gen Z) आहे. विद्यार्थ्यांनी विवेकातून परिवर्तन घडवावे.” पुढे त्या म्हणाल्या, “द्वेषापेक्षा संवादाला महत्त्व द्या. अफवांपेक्षा सत्याची पडताळणी करा, व्यक्तीपूजेपेक्षा विचारांना आणि विभाजनापेक्षा बंधुत्वाला महत्त्व द्या. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्ये आपल्यात जिरपल्यास संविधानाला अभिप्रेत असा समाज निर्माण होईल.”
जलक्रांतीसाठी माणसे तयार करणे हीच प्रेरणा : उज्वलकुमार चव्हाण
सत्कारमूर्ती उज्वलकुमार चव्हाण यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा दाखला देत सामाजिक परिवर्तनासाठी माणसे घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान देणारी माणसे तयार केली, हे त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. आम्ही देखील महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २३८ गावांमध्ये जलक्रांती घडवून आणली आहे. गावात पाण्यासाठी झटणारी माणसे तयार करणे ही आमची प्रेरणा आहे.”
विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाची सवय लावून जीवनमूल्यांसाठी वारकरी संप्रदायातील हरिपाठ ऐकावा, तसेच शाळांनी विपश्यना केंद्र सुरू करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मिलन म्हात्रे यांनी जागवल्या साथी गुलाबराव पाटील यांच्या आठवणी
दुसरे सत्कारमूर्ती मिलन म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेत गुलाबराव पाटील यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता त्यांनी अधोरेखित केली.

Leave a Reply