जय योगेश्वर विद्यालयात सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने जय योगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथे २५ ऑगस्ट २०२६ रोजी सीड बॉल निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका स्मिता सुखदेवराव वानखडे यांनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

जय योगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक के. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. संशोधक मार्गदर्शिका प्रा. डॉ. नयना वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता सुखदेवराव वानखडे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण साक्षरता रुजविण्यासाठी विविध उपक्रम घेत आहेत.

या उपक्रमादरम्यान स्मिता सुखदेवराव वानखडे यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल म्हणजे काय, ते कशा पद्धतीने तयार केले जातात आणि पर्यावरण संवर्धनात त्यांचे महत्त्व काय आहे, याची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सीड बॉल तयार करून घेण्यात आले. उपक्रमात विद्यालयातील इयत्ता बारावीचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी स्वतः सीड बॉल तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

 

देशी वृक्षांच्या बियांचे सीड बॉल

 

सीड बॉल तयार करण्याची शास्त्रीय पद्धत समजावून सांगताना स्मिता सुखदेवराव वानखडे यांनी काळी सुपीक माती, चिकणमाती, सेंद्रिय खत, कंपोस्ट खत आणि गांडूळ खत यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून त्यामध्ये विविध देशी वृक्षांच्या बिया मिसळण्याची पद्धत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून दाखवून दिली. या मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून ते सीड बॉलच्या स्वरूपात कसे तयार करायचे, याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पावसाळ्यात हे सीड बॉल डोंगरदऱ्या, मोकळी अथवा पडीत जमीन आणि वृक्षलागवडीसाठी योग्य ठिकाणी टाकता येतात. पावसाचे पाणी सीड बॉलवर पडल्याने माती व सेंद्रिय घटक मऊ होऊन बिया अंकुरण्यास सुरुवात होते आणि त्यातून रोप तयार होते, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ पर्यावरण संवर्धनाची माहिती न देता प्रत्यक्ष कृतीतून वृक्षनिर्मितीची प्रक्रिया अनुभवता आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी यांची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *