पातोंडा शाळेत राखी निर्मिती स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली दाद

अमळनेर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात सर्जनशीलतेची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पातोंडा येथे यमुताई अवकाळे, अध्यक्ष, धनदीप बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राखी तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या व आकर्षक राख्यांची निर्मिती करून आपल्या कलाकौशल्याचे दर्शन घडविले.

या स्पर्धेत शाळेतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा वापर करून विविध प्रकारच्या सुंदर राख्या तयार केल्या. त्यामुळे शाळेच्या परिसरात सर्जनशील आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेचे बक्षीस वितरण गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख महेश पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगपेटी, कंपास आणि सचित्र बालमित्र पुस्तके अशी बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत मयुरी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. गणेश दत्तात्रय संदानशिव याने द्वितीय, तर रिषभ राहुल लांबोळे याने तृतीय क्रमांक मिळविला. राजेश्वरी पारधी हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या राख्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील कलागुण, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे यावेळी सांगण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पाटील, छाया इसे, सुषमा तायडे, सुनील सोनवणे आणि वैशाली बोरसे यांनी परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *