अमळगावात सौर दिव्यांच्या कामात अपहाराची उपसरपंचांनी केली तक्रार, चौकशी सुरू

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील अमळगाव येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बसविण्यात आलेल्या सौर दिव्यांच्या कामात अपहार झाल्याची तक्रार उपसरपंच जयेश मग्न कोळी यांनी केली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळगाव ग्रामपंचायतीमार्फत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेत १ लाख ३२ हजार रुपये आणि १ लाख ५० हजार रुपये खर्च करून सौर दिवे बसविण्यात आल्याची नोंद असून त्याची बिलेही अदा करण्यात आली आहेत. मात्र, उपसरपंच जयेश मग्न कोळी यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे सौर दिवे आढळून आले नसल्याचा दावा केला आहे.

याबाबत त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे लेखी माहिती मागितली असता, १५ व्या वित्त आयोगातून संबंधित काम झाले नसल्याचे लेखी पत्र मुख्याध्यापकांनी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर जयेश मग्न कोळी यांनी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीची चौकशी विस्तार अधिकारी एस. एस. कठळे यांनी करून संबंधितांचे जबाब नोंदविले असून चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे.

 

अपहार झालेला नाही

 

“अंदाजपत्रकात जिल्हा परिषद शाळेत असे नमूद आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरात सौर दिवे बसवले आहेत. फक्त जागा बदल झाली आहे. अपहार झालेला नाही.”

— मनोज दहिवदकर, ग्रामविकास अधिकारी, अमळगाव

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *