घरकुल, ई-कार्यालयसह विविध योजनांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील इंदिरा भवन येथे सोमवारी (दि. १३ जुलै) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आणि प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रलंबित कामे विहित मुदतीत पूर्ण करून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या बैठकीत विविध घरकुल योजनांची प्रगती, ई-कार्यालय कामकाज, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनांतील अपूर्ण कामे, पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेली विकासकामे, एमएचयूआयडी तयार करण्याचा आढावा, व्हीबीजी-आरएएम-जी योजनेअंतर्गत मस्टर आणि अपूर्ण कामे पूर्ण करणे, ग्रामपंचायत कर आकारणी व करवसुली, पाच, दहा आणि पंधरा टक्के निधीची तरतूद व खर्च तसेच लेखापरीक्षण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामांचा वेग वाढविणे, प्रलंबित कामे त्वरीत पूर्ण करणे तसेच शासनाच्या उद्दिष्टानुसार सर्व विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस. एस. काठरे, विकास इदे, दिनेश साळुंखे, जितेंद्र बोरसे, कृषी विस्तार अधिकारी अमोल भदाणे, कोते, शाखा अभियंता दीपक बोरसे, साठे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी, नोडल अधिकारी तसेच ग्रामीण गृह अभियंते उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *