संत श्री खुशालदास महाराजांच्या पालखी सोहळ्याने अमळनेर नगरी दुमदुमली

अमळनेर (प्रतिनिधी) भावसार क्षत्रिय समाजाचे संत श्री खुशालदास महाराज (फैजपूर निवासी) यांचा पालखी सोहळा २४ नोव्हेंबर रोजी अमळनेर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. जयघोष, वाजतगाजत निघालेली पालखी मिरवणूक, आतषबाजी आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली. या सोहळ्यात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाची सुरुवात भावसार मढी येथे हिंगलाज माता व इतर देवतांना माल्यार्पण करून आरतीने करण्यात आली. त्यानंतर भंडारा उत्सव व अन्नदानासाठी देणगी देणारे समाजबांधव श्री नारायण रघुनाथ शेठ भावसार यांच्या मातोश्री, ॲड. सी. जी. भारोटे आणि श्री राजेंद्र लिलाचंदशेठ सारजे, पुणे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यानंतर पालखीचे पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ बंधू-भगिनी तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाजतगाजत आणि संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषात पालखी मिरवणूक सराफ बाजार, दगडी दरवाजा आणि शिवाजी मार्केट मार्गे काढण्यात आली. शिवाजी मार्केट येथील संत खुशालदास महाराज यांच्या स्मारकावरील प्रतिमेला अध्यक्ष व उत्सव समितीच्या चेअरमन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. भावसार चौक येथे आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर कारंजा चौक मार्गे भक्त निवास, वाडी संस्थान आणि वाडी चौक येथे पालखी मिरवणुकीचा समारोप झाला. याच ठिकाणी आयोजित महाप्रसादाचा समाजबांधवांनी लाभ घेतला. या सोहळ्याला अमळनेर भावसार समाजातील बंधू-भगिनी, बालगोपाल आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिता उदय वाघ यांनीही पालखी मिरवणुकीला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ, महिला मंडळ तसेच समाजबांधवांचे अनमोल सहकार्य लाभले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *